Monday, July 27, 2009

२००३ स्फोट: अखेर तिघे दोषी


मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया व झव्हेरी बाजार येथे २५ ऑगस्ट २००३ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटप्रकरणी अखेर सहा वर्षानंतर तिघा आरोपींना दोषी ठरवण्यात आले. या तिघांना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येईल. अशरत अन्सारी (३२) , सय्यद अनीस (४६) आणि त्याची पत्नी फहमिदा सय्यद (४३) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांवर ' पोटा ' अंतर्गत विशेष पोटा कोर्टामध्ये खटला चालवण्यात आला . लष्कर-ए-तोयबाचा या दुहेरी बॉम्बस्फोटात हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी ४ ऑगस्टला या दोषी आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल. यात या दोषींना कमीत कमी जन्पठेप किंवा फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करू, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. अशा अतिरेकी कारवाईत एखाद्या दांपत्याला दोषी ठरवण्याची ही देशातील पहिलीच वेळ असावी. ५२ जणांचा बळी व सुमारे शंभर जणांना गंभीर जखमी केलेल्या या बॉम्बस्फोटांनी सहा वर्षांपूर्वी मुंबई हादरली होती. मोहम्मद अन्सारी लड्डूवाला आणि मोहम्मद हसन बॅटरीवाला या दोघा आरोपींना ' पोटा ' आढावा समितीने गेल्यावर्षी ' क्लीन चिट ' दिल्याने कोर्टाने त्यांना आरोपमुक्त केले होते. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात १०३ साक्षीदार तपासले असून त्यापैकी गेट वेजवळ बॉम्ब ठेवलेल्या टॅक्सीचा चालक हा महत्त्वाचा साक्षीदार आहे. लड्डूवाला आणि बॅटरीवाला या दोघांना अनुक्रमे मुंब्रा व कुर्ला येथून अटक करण्यात आली होती. बॅटरीवालाच्या दुकानातून ७५० ग्रॅम आरडीएक्स व लड्डूवालाच्या घरातून दोन हातबॉम्ब जप्त झाले. मात्र हा पुरावा ग्राह्य नसल्याचे मत ' पोटा ' समितीच्या अहवालात नमूद झाले. लड्डुवाला व बॅटरीवाला या दोघांना कोर्टाने आरोपमुक्त केल्याने स्फोटके कुणी दिली हा मुद्दा पुढे आला. कटाचा मुख्य सूत्रधार नासिर अहमद हा शिवाजी पार्क येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. मुख्य तपास अधिकारी सुरेश वलीशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सावदे , सहायक पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण , सूर्यकांत तळेकर यांनी केला.

No comments:

Post a Comment